केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या दोन तऱ्हा बघायला मिळाल्या. निःस्वार्थ आणि स्वार्थीपणाचा उदाहरण केरळ पूरग्रस्तांच्या मदत करताना स्पष्टपणे दिसून आले. एक भाजपचे मंत्री गिरीष महाजन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री. एअर फोर्सच्या विमानाने डॉक्टर्स आणि वैद्यकीय मदत सामग्रीची सरकारी मदत घेऊन केरळला गेले; वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्यामुळे आणि सरकारी मदत असल्यामुळे त्यांच्या एका आदेशावर डॉक्टरांची फौज आणि टनभर वैद्यकीय सामग्री जमा झाली. मात्र एकंदर वातावरण निर्मिती अशी केली गेली की, जणू काही त्यांनी ही वैयक्तिक पातळीवरच मदत केली आहे. मीडियातून व्यवस्थित प्रसिद्धी घडवून आणली गेली. एअर फोर्सच्या विमानाने सामान आणि डॉक्टरांची टीम जाणार होती, त्याच्या कव्हरेजसाठी प्रसारमाध्यमांचे जे प्रतिनिधी विमानतळावर उपस्थित होते, त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट त्या विमानात बसवून केरळला नेण्यात आलं. बिचाऱ्यांकडे ना बदलायला कपडे होते, ना सकाळी उठल्यावर तोंड धुवायला ब्रश. तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचं अफलातून उदाहरण या निमित्ताने बघायला मिळालं.
केरळला जाऊन त्याच संध्याकाळी गिरीष महाजन डॉक्टर मंडळींना केरळमध्येच सोडून पुन्हा महाराष्ट्रात परतले देखील. मात्र, त्यानंतर साधारण आठवडाभराने, म्हणजे शनिवारी त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं. त्यात ‘गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली केरळला गेलेल्या वैद्यकीय पथकाने १७ हजार रुग्णांना घरोघरी जाऊन तपासलं,’ असं नमूद करण्यात आलंय. श्री. महाजन यांचं प्रसिद्धीपत्रक खालीलप्रमाणे आहे
केरळमध्ये १७ हजारांवर पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी
ना. गिरीष महाजन यांनी दिला लाखो नागरिकांना आधार : घरोघर जाऊन तपासणी, औषधींचे वाटप सुरू
पट्टमपितम, त्रिचुड, अर्नाकुल्लम कल्पि अदि जिल्हात आरोग्यसेवा सोबतच जनसंपर्क अभियान
जळगाव, दि.२५ – महाराष्ट्रातून जावून केरळ पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांनी आरोग्यसेवकाची भुमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. पाच दिवसात तब्बल १७ हजारांवर रुग्णांची तपासणी करण्यात आली असून लाखो नागरिकांना मानसिक आधार देण्याचे काम ना. महाजन यांनी केले आहे.
केरळ पूरग्रस्तांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री महाजन यांच्या नेतृत्वात १०० तज्ज्ञ आणि स्वयंसेवकांची टीम केरळला गेली होती. केरळच्या पट्टणपितम, त्रिचूड, अर्नाकुल्लंम, अलपी या जिल्ह्यात पथकाने आरोग्यशिबिर सुरू केले होते. गेल्या ५ दिवसात १७ हजारांवर रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना शिबिराच्या ठिकाणी येणे शक्य नाही अशांची घरी जावून तपासणी करण्यात येत आहे.
*लाखो रुग्णांना औषधींचे वाटप*
महाजन यांच्या पथकाने सोबत घेतलेल्या मुबलक औषधींचे अद्यापही लाखो नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. पुरामुळे धीर खचलेल्या नागिरकांचे मनोबल उंचावत त्यांना आधार देण्याचे काम ना.महाजन यांनी केले आहे. महाजन यांच्या कार्याची स्थानिक पातळीवर दखल घेण्यात येत असून आरोग्यदूत म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.
वरील प्रसिद्धीपत्रकात कुठेही सदरचे पथक आणि मदत महाराष्ट्र सरकारच्या वतीने पाठवण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले नाही. एकंदरीत चित्र असं उभं केलं गेलंय की, महाजन यांनी व्यक्तिगत स्तरावर ही सगळी जमवाजमव करून स्वखर्चाने केरळच्या पूरग्रस्तांना ही मदत दिली. ना सरकारचं नाव, ना हे सरकार चालवणाऱ्या त्यांच्या पक्षाचं नाव. आयत्या बिळावर नागोबा होण्याचाच हा प्रकार म्हटलं पाहिजे.
दुसरीकडे याच सरकारमधले एक वजनदार मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ही ३० डॉक्टरांचं पथक, अडिच टन वैद्यकीय मदत सामग्री आणि तब्बल ५० टन जीवनावश्यक वस्तूंची मदत सामग्री घेऊन शुक्रवार, २४ ऑगस्ट रोजी केरळला रवाना झाले. ही मदत सरकारी नव्हती, तर शिवसेना पक्षाच्या वतीने होती. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर एवढी मोठी मदत उभी केली. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटनांशी चर्चा करून डॉक्टरांचं पथक तयार केलं. तब्बल अडिच हजार किलो, म्हणजे अडिच टन वैद्यकीय मदत सामग्री जमा केली. याखेरीज कपडे, ब्लँकेट्स, चादरी, ३० टन तांदूळ, १० टन डाळ, बिस्किटाचे पुडे असं ५० टन सामान जमा केलं. नेत्रावती एक्स्प्रेसला दोन विशेष पार्सल व्हॅन जोडून हे सर्व सामान केरळला रवाना केलं आणि स्वत: ३० डॉक्टरांचं पथक घेऊन केरळला गेले.
तिथे दोन दिवस केरळ सरकारने सुरू केलेल्या मदत शिबिरांमध्ये फिरले, तिथल्या लोकांशी बोलले. तिथल्या गरजा ओळखून सोबत नेलेल्या मदत सामग्रीचं वाटप केलं. आणि एसडीव्ही स्कूल, कनिचुलनगरा मंदिर, चेरुथाना, चेन्नगरूर अशा विविध ठिकाणी महा वैद्यकीय शिबिरं आयोजित करून तीन दिवसांत १२ हजारहून अधिक रुग्णांची तपासणी केली. तेथील स्थानिक खासदार वेणुगोपाल, सुरेश यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अलेप्पीचे जिल्हाधिकारी सुहास यांची भेट घेऊन त्यांच्याकडून गरजा जाणून घेतल्या आणि त्यांनाही वैद्यकीय मदतसामग्री सुपूर्द केली. केरळमध्ये शिवसेनेची ही टीम असतानाच ओणम होता. पण पुराच्या पार्श्वभूमीवर यंदा केरळवासीयांमध्ये ओणम साजरा करण्याचा उत्साहच नाही. अनेक सामाजिक संघटनांनी ओणम निमित्त आयोजित होणारे कार्यक्रम रद्द करून तो पैसा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे. आजही काही लाख लोक पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या मदत शिबिरांमध्ये आहेत. त्यांच्यासमोर उद्याची चिंता आहे, त्यामुळे ओणम साजरा करण्याच्या मन:स्थितीत केरळी समाज नाही, हे ओळखून एकनाथ शिंदे यांनी तेथील शिबिरांमध्ये ओणमच्या दिवशी पूरग्रस्तांना लाडू वाटले आणि त्यांना जगण्याची नवी उमेद देण्याचा प्रयत्न केला.
हे सर्व करत असताना ‘हे मी केलं’ अशी टिमकी वाजवणं नाही. खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणिकर, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी आपल्या सहकाऱ्यांचा, तसंच या मदतीसाठी सहभाग देणाऱ्या सर्व डॉक्टरांचा ते आवर्जून उल्लेख करत होते आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व मदतीचं श्रेय ते उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला देत होते.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आणखी एक महत्त्वाचा उल्लेख केला. तो म्हणजे, “इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा शिवसेना जात-पात-धर्म-पंथ-भाषा यांचा विचार न करता संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाते. त्याप्रमाणेच केरळच्या पूरग्रस्तांसाठी उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ठाण्याची शिवसेना इथे मदतीसाठी आली आहे,” असं ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने केरळला मदत देण्यासंदर्भात ज्याप्रकारचं घृणास्पद राजकारण चालवलंय, त्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचं आहे. संकटात सापडलेल्या माणसाकडे माणूस म्हणून न बघता, त्याला धर्माचं आणि विचारसरणीचं लेबल जोडून राजकारण करण्याचा प्रकार भाजपने चालवलाय. आपल्या जाहिरातबाजीवर साडेचार हजार कोटींची उधळपट्टी करणाऱ्या केंद्र सरकारनेही ५०० कोटींची तुटपुंजी मदत केरळच्या तोंडावर फेकली. भाजपला केरळमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. गेली अनेक वर्षं तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून डाव्यांना उखडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यात यश आलेलं नाही. देशभरातील निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींचा भाजप यश मिळवत असताना केरळमध्ये मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांचं सरकार आलं. त्यामुळेच डावे, उजवे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी विभागणी करत मदतीबाबतीत आखडता हात घेण्याचं काम बहुदा सुरू असावं.
या पार्श्वभूमीवर केरळमध्ये फारसं राजकीय अस्तित्व नसताना किंवा तिथे राजकीय महत्त्वाकांक्षा नसताना देखील शिवसेनेच्या शिलेदारांनी तिथे मदतीसाठी धावून जाणं निश्चितच कौतुकास्पद आहे. एका पक्षाचे मंत्री जनतेच्या पैशातून उभी राहिलेली सरकारी मदत स्वत:च्या नावावर खपवतात, स्वत:ची टिमकी वाजवतात आणि दुसऱ्या पक्षाचे मंत्री मात्र सगळं स्वत: करूनही टिमकी वाजवण्याचं टाळतात आणि संकटग्रस्तांच्या मदतीवर लक्ष केंद्रित करतात, हे चित्र पुरेसं बोलकं आहे.